डॉ. अनंत हर्षवर्धन
अध्यक्ष
बुध्द प्रतिष्ठान, वाशी, नवी मुंबई
सविनय जयभीम, नमो बुद्धाय,
बांधवांनो, आपले आदर्श व विश्वाला शांतीचा तथा दुःख मुक्तीचा मार्ग सांगणारे, महाकारुणिक सम्मासंबुध्द व भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त मानवतावादी दृष्टिकोन ठेवून जगातील प्राणिमात्रांचे व निसर्गाचे जनहितार्थ रक्षण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावले. हे आपण विविध भाषणातून, वाचनातून, परिसंवादातून, तसेच अनेक विचारवंतांकडून शिकून, श्रवण करून आपल्या जीवनाची कल्याणकारी व प्रगतीशील दिशेने वाटचाल करत असतो. सृष्टीचे नियम परिवर्तनशील आहेत व अटळ आहेत, हे देखील आपल्या आदर्शाकडून आपण शिकलो आहोत. आपले उद्दिष्ट व महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी दिलेले मौलिक विचार दिर्घ कालीन असून जगात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय या मूल्यांची अखंड विश्वात शांतता व दुःखमुक्त जीवन प्रस्थापित करण्यासाठी मार्गदर्शक ठरले आणि जगाने12 देखील स्वीकार करुन त्यास मान्यता दिली आहे.
आपल्या बुध्द प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम व उपक्रम हाती घेऊन आपल्या आदर्शाचे विचार आपण आपली प्रापंचिक, सामाजिक आणि धार्मिक उन्नती प्रगतीशील व सुसंस्कृत जीवनशैली ठेवण्यासाठी समाजघटकांमध्ये रूजवत आहोत, ही स्वागतार्ह बाब आहे. सद्दस्थित कार्यकारिणी व या अगोदरच्या कार्यकारिणी सदस्यांनी रात्रदिवस काम करुन आपल्या समाजाला अमूल्य अशा विचारांचे लाभार्थी होण्यासाठी सतत मेहनत घेतली आहे, घेत आहेत. आपणास माहीत असेलच की बुध्द विहार बांधण्यासाठी किती कष्ट उपसावे लागले आहेत परंतु हे काम आपण न डगमगता आपल्या कुटुंबियां साठी व येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी करणे आवश्यक आहे, नव्हे तर ते आपले कर्तव्यच आहे ही जाणीव ठेवून, झोकून काम करण्याची मानसिकता दृढनिश्चय आणि आत्मविश्वास बाळगून करीत आहोत.
आपल्या बुध्द प्रतिष्ठान संस्थेच्या बुध्द विहाराला कायदेशीर भोगवटा प्रमाण पत्र मिळाले येथ पर्यत एक टप्पा आपण गाठला आता दुसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा असून संस्थेच्या विहित घटनेत नमुद केल्या प्रमाणे विविध उपक्रम हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी खालील प्रमाणे कार्यक्रम आयोजित करणे
आपल्या आदर्शाचे विचार समाजाच्या सर्व थरापर्यत पोहचवणे.
बुध्द विहार समन्वय समिती कार्यक्षम करणे.
समाजातील विद्याथ्र्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून तज्ञांचे मार्गदर्शन प्राप्त करून देणे.
तरुणांसाठी उच्च शिक्षण, नोकरीच्या संधी तथा उद्योगधंदयाच्या संधी बाबतचे देश आणि देशाबाहेर विशेष तज्ञामार्फत मार्गदर्शन त्याचबरोबर आर्थिक नियोजनासाठी मार्गदर्शन इ. सेवा उपलब्ध करुन देणे.
शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलन ठेवण्यासाठी शिबिरे आयोजित करणे.
विपश्यना ध्यान शिबिरासाठी विशेष नियोजन करणे.
विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करणे.
योग विद्या व मार्शल आर्ट्स वर्ग सुरू करणे.
शैक्षणिक परीक्षांची तयारी करण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन प्राप्त करणे.
आपल्या मुलांना चित्रकला, अभिनय, नृत्य, संगीत या क्षेत्रात कार्यरत करण्यासाठी मार्गदर्शन करणे.
जनजागरण कार्यक्रम आयोजित करून त्या द्वारे प्रबोधनात्मक कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन व नशा मुक्ती केंद्र स्थापित करणे.
आपल्या आदर्शानी आपल्याला दिलेले धम्म अमृत सुक्ष्म पणे अवलोकीत करण्यासाठी महान बौध्द भिक्खूं तसेच धम्म उपासकांचे आयोजन करणे.
आपली मिळकत, व तीचे विभाजन तसेच बचत गट निर्माण करून प्रोत्साहित करण्यासाठी आयोजन करणे.
आपल्या समाजाची दुरावस्था दूर करून सांघिकदृष्ट्या मार्गदर्शन करण्यासाठी शिबिर आयोजित करणे -
रक्तपेढी व आरोग्य तपासणी यांच्या शिबीराचे नियोजन करणे.
कायमस्वरुपी ओ. पी. डी. डॉक्टरांची व्यवस्था करणे.
केंद्रीय लोकसेवा परीक्षांची तसेच नोकर भरतीची माहिती व सल्ला देण्यासाठी व्यवस्था करणे.
वरील ठळक कार्यक्रमांतर्गता संस्थेच्या माध्यमातून वार्षिक कार्यक्रम यशस्वी करणे, भन्ते निवासाची व्यवस्था निर्माण करणे, विहाराचे वेगवेगळ्या प्रतिगामी राजकीय व समाजकंटकांपासून संरक्षण करणे. बांधवांनो, उपरोक्त उपक्रम राबविण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी आपण कट्टीबध्द होणे गरजेचे आहे तसेच आपण संस्थेच्या कार्याला वेळ दिला तरच आपण आखलेली ध्येय उदिष्टे प्रत्यक्ष साकार करू शकतो. आपली संस्था महाराष्ट्रातील आपल्या समाजाची मानबिंदू ठरवण्यासाठी आपल्याला नैतिक जबाबदारीचे पालन करणे आवश्यक आहे.
नवी मुंबई मध्ये स्थित आपल्या समाजाचे सर्वात मोठे विहार असून त्या मध्ये सहा फूट उंच अशी भगवान गौतम बुध्दांच्या भगवंताच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे तसेच विहाराच्या माध्यमातून दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी आर्थिक स्त्रोत सुरू करून काही अंतर्गत सजावटीची कामे करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वखुशीने आर्थिक मदत (दानपारमिता) आपण अंगिकार कराल यात शंका नाही.
आपणास बुध्द प्रतिष्ठानच्या वतीने तथागत भगवान गौतम बुध्द व भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जंयतीच्या हार्दीक शुभेच्छा.
धन्यवाद!
जय भीम नमो बुद्धाय!
डॉ. अनंत हर्षवर्धन
अध्यक्ष
बुध्द प्रतिष्ठान, वाशी, नवी मुंबई
सविनय जयभीम,
बुध्द प्रतिष्ठान, वाशी, नवी मुंबई स्थित असलेली, आपल्या बौध्द बांधवांची संस्था वेगाने वाढत असून याचे समस्त समाजाला समाधान होत आहे. उपरोक्त संस्थेची १९८१ साली धर्मदाय आयुक्तालयात नोंदणी झाली. त्या अगोदर कित्येक वर्षांपासून वाशी नवी मुंबई स्थित धम्म बांधवांनी अनेक अडचणीला सामोरे जात आपल्या संस्थेची उभारणी केली. हे वास्तव कोणीही विसरून चालणार नाही. सन १९७२ साली बौध्द सभा नावाची संस्था दिवंगत आर. डी. भंडारे साहेब (माजी राज्यपाल, बिहार व सिडको चेअरमन) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आणि ह्या संस्थेला वाशी बस स्टँडच्या बाजूला बुध्द विहारासाठी सिडकोने भूखंड दिला होता, (सध्या तेथे गुरुद्वाराची उभारणी झाली आहे) परंतु सिडकोच्या नियमानुसार ठराविक कालावधीत काम न झाल्याने तो जप्त करण्यात आला. असो, बुध्द प्रतिष्ठानची निर्मिती झाल्या नंतर पुन्हा एकदा नव्या दमाने आपल्या बांधवांनी धम्म कार्याला वाहून घेतले. आपले आदर्श तथागत भगवान बुध्द, प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छ. शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांना जनमानसात रुजवण्यासाठी प्रयत्नशील झाले. त्या अनुषंगाने आपल्या वैयक्तिक व सामाजिक कुवतीनुसार संस्थेच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करून धाम्मिक व सामाजिक चळवळ पुढे नेत होते परंतु समाधानकारक प्रतिसाद मिळत नव्हता. सोयी सुविधा नसताना देखील प्रचंड आत्मविश्वास व ताकदीने जीव ओतून काम करत होते या मध्ये ई एस आय हॉस्पिटल स्टाफ क्वार्टर मध्ये रहात असलेले व एम एस ई बी स्टाफ क्वार्टर मध्ये राहणाऱ्या आपल्या बांधवांचा मोठा सहभाग आहे. तसेच तुर्भे व त्या वेळी असलेले सेक्टर १,२,३,४,५,६,७ वाशी येथील आपल्या रहिवाशांचा सहभाग अविस्मरणीय आहे. सन १९८४ नंतर फार मोठ्या प्रमाणावर वाशी शहराची वाढ झाली आणि अनेकांबरोबर आपल्या अनेक बांधवांना वेगवेगळ्या सेक्टर मध्ये निवासांची प्राप्ती झाली आणि तेव्हापासून आपल्या आदर्शाची वैचारिक चळवळ अधिक गतिमान व्हायला सुरूवात झाली. सोयी सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने आपल्या बांधवांचे एकमेकांबरोबर संपर्क साधणे कठीण होत होते.
तसेच नवीन आलेल्या बांधवांना जुन्या स्थानिक असलेल्या आपल्याच बांधवांशी ओळख नव्हती. त्यामुळे सुसंवाद होत नव्हता आणि परिणामी नवीन आलेल्या (१९८५ नंतर) आपल्या धम्म बांधवांनी सामाजिक भावनेतून बौध्द सेवा संघ या धाम्मिक संस्थेची स्थापना केली. ह्या संस्थेच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम प्रचंड प्रमाणात होत असत. विशेष म्हणजे कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद व गर्दी होतअसे. सहकुटुंब सहपरिवार सह आनंदाने धम्मकार्यात सहभागी होण्यासाठी आपले बांधव उत्सुक असत. प्रत्येक कुटुंबियांमध्ये जवळीक निर्माण झाली. ते एकमेकांच्या सुख दुःखात सामील होऊ लागले. एकमेकांमध्ये मंगल मैत्री ठेवून एकमेकांचा सन्मान ठेवत असत. प्रत्येकाला नवी मुंबई मध्ये नवीन घरात आल्याचा आनंद होत होता. बुध्द प्रतिष्ठान कार्यकारिणीचे देखील कार्यक्रम सुरू असत, आपल्या संस्थेची जागा असावी असे मत त्या वेळी सभासदांमध्ये रुजू व्हायला सुरुवात झाली परंतु तुटपुंज्या पगारात घेतलेल्या घरांचे कर्ज या मध्ये आपला धम्म बांधव अडकलेला होता. आर्थिक विवंचनेत देखील बुध्द प्रतिष्ठानच्या त्या वेळच्या कार्यकारिणी आपले बुध्द विहार बांधण्यासाठी सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून घेतला आणि त्या नंतर भूखंड मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासन व सिडको प्रशासना बरोबर भेटीगाठी व पत्रव्यवहार सुरू झाले. समाज बांधवांनी देखील आपल्या संस्थेसाठी भूखंड विकत घेण्यासाठी निधीची तरतूद करण्यासाठी आवाहन करत असत. विशेष म्हणजे कार्यकारिणी मंडळावर कोण आहेत याला महत्त्व न देता झोकून काम करण्याची वृत्ती आपल्या अनेक बांधवांमध्ये होती आणि हेच आपल्या चळवळीचे सर्वात मोठे भांडवल होते. अनेकांच्या त्यागातून, प्रयत्नातून, सहकार्याने सिडकोने आपल्या सध्या स्थित असलेला भूखंड विहार उभारण्या साठी वाटप केला परंतु ताबा मिळविण्यासाठी रूपये दोन लाख साठ हजार (रुपये. २.६०लाख) लिज प्रिमियमचा भरणा करण्यासाठी सांगितले. तत्कालीन कार्यकारिणी सदस्य व सभासद यांनी हे आव्हान स्विकारले. आपल्या धम्म बांधवां कडून दहा वीस रुपये देखील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सन्मान ठेवून घेत असत. काहींनी कुवतीनुसार अधिक प्रमाणात रक्कम संस्थेच्या खात्यात जमा केली.
निर्धारित कालावधीत भूखंड ताब्यात घेण्यासाठी सर्व बांधवांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. भगवान बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीसाठी वायफळ खर्च न करता तो सर्व निधी भूखंड घेण्यासाठी ठेवला. स्मरणिका व चॅरीटी शो ची तिकीटे व जाहीराती विक्रीतून निधी युध्द पातळीवर उपलब्ध करून शेवटी भूखंड प्राप्त करून घेतला. नवी मुंबईत आपल्या संस्थेने केलेला हा प्रयत्न आणि मिळालेला विजय आपल्या धम्म बांधवांनी आनंदाने साजरा केला परंतु एक आव्हान संपले तर दुसरे निर्माण होते. सिडकोने संस्थेबरोबर करार करताना स्पष्ट पणे लिहिले ८०५ चौ. फूट क्षेत्रफळ असलेल्या भूखंडावर करारा नुसार पाच वर्षे विहीत कालखंडात इमारत बांधकाम पूर्ण करुन OC मिळवून सिडको प्रशासनाला सादर करावी लागेल. कार्यकारणीने विशेष सर्व साधारण सभेत सिडको प्रशासन व बुध्द प्रतिष्ठान यांच्या मध्ये झालेला करारनामा सादर केला. त्यावेळी संपूर्ण ईमारत बांधण्यासाठी जवळपास रूपये तीस लाख (रुपये ३०/- लाख) एवढ्या मोठ्या रकमेची गरज होती. एवढा पैसा कसा उभारायचा यावर चर्चा सुरू झाली. आपली संस्था धर्मदाय आयुक्तालयात मंजूर केलेल्या घटनेनुसार चालणारी होती घटनेची चौकट सांभाळून कसे काय करायचे हा भयानक प्रश्न सर्व धम्म बांधवांना सतावत होता. एखादा चॅरीटी शो लावला तर यशस्वी करून फारतर साठ सत्तर हजार रुपये मिळत होते आणि धम्मबांधव देखील वाढत्या कौटुंबिक जबाबदारीने दबलेला होता आणि येथेच आपल्या दुर्दैवाने धम्म बांधवांचे संतुलन बिघडत चालले अनेकदा मतभेद निर्माण होऊन एकमेकां मध्ये कटूता निर्माण होऊ लागली. इमारत निधीसाठी मार्ग न मिळाल्याने हतबल झाले. संस्थेतून काही बांधवांनी काढता पाय घेतला. त्या मधून फुले, आंबेडकर प्रबोधिनीची स्थापना झाली. तिच्या माध्यमातून निधी उपलब्ध होतो का तोही प्रयत्न यशस्वी झाला नाही.
त्रैलोक्य बौध्द संघाचे अनेक धम्म बांधव विहार बांधण्यासाठी पुढे आले. त्यावेळी त्यांनी एक दोन वर्षात विहार बांधून देण्याचे आश्वासन दिले. धम्मबांधव बऱ्याच अंशी सुखावले. त्यांना दिलासा मिळाल्यामुळे ते पून्हा सक्रिय झाले परंतु त्यांची ही आशा फोल ठरली, कारण जाहीर सभेत केलेले आश्वासन त्रैलोक्य बौध्द संघाने पाळले नाही. परिणामी विहीत काळात बांधकाम पूर्ण न झाल्याने सिडकोने कराराच्या मुद्यावरून आपल्या संस्थेला नोटीस बजावली. त्या मध्ये रुपये साडेसात लाख दंड ठोठावला होता व भूखंडावर ईमारत विकसित न केल्यामुळे तो भुखंड काढून घेऊ अशा प्रकारची विचारणा करण्यात आली.'
सिडकोच्या टर्मिनेशन नोटीसमुळे आपल्या संस्थेचे संघटनात्मक स्थैर्य संपुष्टात येऊ लागले. जो तो धम्म बांधव एकमेकां विरुध्द कुरघोडी करू लागला. त्यामध्ये काही निष्क्रीय बांधवांनी सक्रिय सहभाग ठेवणाऱ्या बांधवांना उपहासात्मक रित्या डिवचण्याचा आनंद मिळवत होते. संस्थेची घडी विस्कळीत झाली होती. अशा वेळी निवृत्त झालेली बांधव पुढे आले. त्यांनी तरुणांना पुढे ठेवून मार्गदर्शन करून संस्थेला सावरण्यासाठी पुढाकार घेतला. अस्थिर वातावरणामुळे संस्थेचे धर्मदाय आयुक्तांनी पाठवलेल्या पत्रांकडे दुर्लक्ष झाले. कोणताही पत्रव्यवहार न झाल्याने धर्मदाय आयुक्तांनी आपल्या संस्थेच्या फाईल वर शेरा मारून रद्दीखान्यात टाकून दिली. अशा भयानक परिस्थिती मध्ये भूखंड वाचवणे, धर्मदाय आयुक्तालयात संस्थेला नियमित करणे आवश्यक असल्याचे जाणून त्यादृष्टीने तत्कालीन बुध्द प्रतिष्ठान कार्यकारिणी द्वारे काम सुरू झाले.
संस्थेची कागदपत्रे गहाळ व विखुरलेले होते. सभासद सूची एकच असे त्या मध्ये जयंतीची वर्गणी देणारा देखील सभासद म्हणून गणला जात असे. संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रचंड उदासीनता असल्याने तसेच मतभेद व विकोपाला गेलेली कटुता यामुळे खूपच अल्प प्रमाणात धम्म बांधवांचा सहभाग होता. जिल्हा वाद हा एक नवीन वाद निर्माण होऊ लागल्याने कार्यकारिणीला काम करणे त्रासदायक होऊ लागले. शेवटी कार्यकारिणीने आपले राजकीय हितचिंतक असलेल्या व्यक्तींना भेटून त्यांचे मार्गदर्शन व पाठबळ घेण्याचे ठरवले.
त्या अनुषंगाने माजी समाजकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य, सन्माननीय चंद्रकांत हंडोरे साहेब यांची वाशी येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यांना आपल्या संस्थेची सविस्तर माहिती दिली तेव्हा त्यांनी विहाराच्या जागेवर पहिली मिटींग बोलावली व मार्गदर्शन देत सांगितले की मी स्वतः जातीने लक्ष घालून हे अतिशय चांगले काम पूर्ण करीन. त्या नंतर त्यांनी वाशी स्थित त्यांच्या निवासस्थानी कार्यकारिणीला बोलावले. त्या वेळी आर पी आय जेष्ठ नेते सन्माननीय सुमंतराव गायकवाड उपस्थित होते. आयु सुमंतरावांनी सिडको मध्ये जनसंपर्क अधिकारी असलेले त्यांचे पुतणे दिवंगत बुध्दभूषण यांना संपर्क साधून आपल्या संस्थेच्या भूखंड वाचवणे बाबत चर्चा केली आणि कार्यकारिणीलासहकार्य करण्यास सांगितले. सन्माननीय हंडोरे साहेब यांनी तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या निदर्शनास आपल्या संस्थेच्या भूखंडावर सिडको प्रशासनाने कारवाई करणार असल्याचे सांगून ती कारवाई होऊ नये यासाठी संस्थेच्या वतीने विनंती केली, परंतु संस्था धर्मदाय' आयुक्तालयात नियमित करुन घेणे महत्त्वाचे होते, तेव्हा तत्कालीन धर्मदाय आयुक्त सन्माननीय बी. एन. वाघ साहेब यांना संस्थेच्या माध्यमातून मदत करण्यासाठी विनंती केली. ती त्यांनीस्वीकारून संस्थेला कायद्याच्या कचाट्यातून सोडवून संस्थेला नियमित करून घेतले. त्यामुळे नगरविकास खाते तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या दिवंगत विलासराव देशमुख यांच्या कडे असल्याने संस्थेला कोणताही दंड न आकारता व या पुढे टर्मिनेशन नोटीस न बजावता संस्थेला भूखंड पुन्हा मिळाला, या कामात सन्माननीय गणेश दादा नाईक, सन्माननीय दिवंगत एन डी कांबळे, परिवर्तन को. आप बँक, सन्माननीय दिवंगत बुध्दभूषन गायकवाड यांचे फार सहकार्य लाभले.'
नवनिर्वाचित कार्यकारिणीने कामाची आखणी व त्या अनुषंगाने लागणारा निधीची उपलब्धता करण्याचे ठरविले. बांधवानो, आता पर्यंत अनेक कार्यकारिण्या आल्या आणि त्यांनी बुध्द प्रतिष्ठान कसे असावे याचे अनेक पत्रका द्वारे स्वप्न दाखवले परंतु आज पर्यंत साकार झाले नाही. १९९६ च्या आसपास आपल्या शेजारी गुजरात भवन ५० लाख रुपये खर्चुन तयार झाले आणि अशा प्रकारे इतर समाजातील लोकांनी कमी खर्चात आपले सांस्कृतिक भवन उभे केले आणि त्याच्या माध्यमातून भरपूर पैसा कमावला आणि आपल्या समाजाचा सांस्कृतिक विकास देखील करुन घेतला या साठी त्यांनी जागृतता दाखवली. त्याचे फळ त्यांना मिळाले परंतु आजही आपल्या धम्मबांधवांकडे भरपूर पैसा व स्थावर मालमत्ता असताना त्यांनी दाखवलेल्या अकार्यक्षमते मुळे, दिरंगाई मुळे व वाढत्या महागाईमुळे विहाराचे बजेट कोलमडलेच, पण त्याच बरोबर ज्यासाठी आपण एवढा खटाटोप करतो तो देखील आपल्याला प्राप्त करता आला नाही. भगवान बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समाज उभारणी याची नैतिक जबाबदारी आपण केव्हा स्वीकारणार? राज्यकर्ता समाज म्हणून आपल्याकडे पाहिले जाते त्यामुळे धर्माध सांप्रदायिक शक्तीकडून आपल्यावर वारंवार हल्ले होत असून आपले संविधानाचे अस्तित्व धोक्यात आले तरीही आपण आपला नाकर्तेपणा व उथळ आदर्शवाद सोडायला तयार नाही. आपल्या दानावर अनेक पिढ्या विकसित होणार आहेत. जर आपल्याला काही करता येत नसेल तर जो कोणी करत असेल त्याला पाठिंबा देऊन त्याचे मनोधैर्य उंचावण्यासाठी प्रयत्नशील रहा. असो.
नवनिर्वाचित कार्यकारिणीने प्रथम मागील कमिटीने बांधलेल्या विहाराचे फिनिशिंग करुन तो प्रबोधनात्मक कार्यक्रम व ईतर कामासाठी तयार केला. या साठी व पुढील वाटचालीसाठी तसेच लागणाऱ्या बांधकामा साठी निधीची व्यवस्था अनेक कंपन्यांच्या व्यवस्थापना बरोबर चर्चा व बैठका घेऊन उभा करण्यासाठी दिवस रात्र झटत होते. प्रसंगी दूरवरचा प्रवास करून मॅनेजमेंट बरोबर संपर्क साधून किंवा प्रत्यक्षात भेटून आपल्या संस्थेची माहिती देऊन व आपणा कडून मिळणारा निधी व त्याचे नियोजन पटवून देण्यासाठी न थांबता न थकता करत होते.
वाढत्या कामाचा व्याप ठराविक लोकांवर जास्तच येऊ लागला. सध्या कमिटी मध्ये असलेले सभासद संख्येने कमी पडू लागले, तेव्हा बुध्द प्रतिष्ठानची प्रथमच घटना दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यासाठी आपल्याच तीन चार सभासदांची नेमणूक करुन मसुदा तयार करण्यात आला. विशेष सर्वसाधारण सभेत घटनेचा मसुदा उपस्थित सर्व सभासदांना सहभागी करुन वाचायला दिली. त्यावर साधकबाधक चर्चा करून बहुमताने घटना दुरुस्तीचा मसुदा पारीत करण्यात आला. कमिटीत आणखी क्रियाशील सभासदांना सहभागी करण्यात आले. दर रविवारी सकाळी पूजा पाठ, पौर्णिमेचे कार्यक्रम जाहीर करून घेतले जात असत. एका बाजूला विहाराची उभारणी तर दुसऱ्या बाजूला आखणी करून वर्षभरातील कार्यक्रम सुरू झाले. कार्यक्रम दर्जेदार होण्यावर विशेष लक्ष देण्यात आले. त्या साठी अनुभवी सभासदांना सल्लागार कमिटीमध्ये कार्यरत केले. वाशी नवी मुंबईत व मुंबई बाहेर बुध्द प्रतिष्ठानची ओळख निर्माण झाली.
सिडकोने टाउन प्लॅनिंग अॅक्ट द्वारे प्रत्येक नोडमध्ये सर्व धर्माच्या साठी भूखंड आरक्षित ठेवला आहे. आपण भूखंड मिळवला तो राखण्यासाठी किती प्रयत्न व त्यासाठी लागणाऱ्या यातना सहन कराव्या लागल्या याचा आपणास चांगलाच अनुभव आहे. परंतु आपल्या बाजूला असलेल्या धम्म बांधवांनी याचा चांगलाच धसका घेतला आणि त्यानी वास्तू उभारणीच्या नादाला न लागता फक्त आपल्या नेहमीच्या कार्यक्रमात लक्ष केंद्रित केले त्यामुळे नवी मुंबईत स्थित आपले बुध्द प्रतिष्ठान मार्गदर्शक आदर्शवत ठरले तर नवल ते काय? बुध्द प्रतिष्ठानच्या पहिल्या मजल्याचे नामकरण करण्याचे ठरविण्यात आले. माता रमाई भिमराव आंबेडकर या नावाला सर्व सभासदांनी पाठींबा देऊन सहमती दिली. सदर कार्यक्रमात नवी मुंबईचे शिल्पकार सन्माननीय गणेश दादा नाईक साहेब प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित झाले व कार्यकारिणीने आमंत्रित करून पहिल्या मजल्याचे नामकरण करून त्यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. आज त्या हॉलमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जात आहेत.
संपूर्ण विहार बांधण्यासाठी संकल्प करण्यात आला. आपल्याला मिळालेला ८०५ चौ. मी भूखंड त्यावर होणारे किती चौ. मी. करता येईल यावर संस्थेचे आर्किटेक्चर आयु शेखर बागुल साहेब यांनी बांधकामाचा आराखडा तयार केला. पुन्हा सिडको प्रशासना कडे फेऱ्या घालून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले व नवी मुंबई महानगरपालिकेत ईमारत आराखडा मंजूर करण्यासाठी पाठवला. तो मंजूर होण्यासाठी तब्बल सहा सात महिने लागले. फायर सी सी मिळवून केलेल्या कामाचे सर्टिफिकेट फायर ऑफिसर कडून प्राप्त केले. बांधकामाला सुरुवात झाली. अनेक वेळेला 'कार्यकारिणी कडून धम्म बांधवांना आर्थिक योगदान करण्यासाठी विनवण्या करण्यात आल्या परंतु ठराविक बांधवां व्यतिरिक्त कोणीही भक्कम योगदान देण्यासाठी पुढे येत नव्हता. नाईलाजाने कार्यकारिणीला कंपनीच्या प्रशासकीय ऑफिसांना आर्थिक मदतीसाठी जावे लागत असे. प. पू डॉ बाबासाहेबांनी म्हटले होते
'आपल्या लोकांनी मोक्याच्या जागा काबीज केल्या पाहिजेत.' येथे ही बाब प्रकर्षाने लक्षात आली. तत्कालीन संस्थेच्या अध्यक्षाचे संबंध सर्व कंपनी प्रशासना बरोबर सलोख्याचे होते आणि आपल्या कंपनीच्या वतीने होणारे आर्थिक योगदान अतिशय चांगल्या कामासाठी उपयोगी पडत असल्याने ते आपल्या संस्थेला उत्स्फूर्तपणे योगदान करत होते. कार्यकारिणी देखील आलेल्या निधीचा विनियोग विहार बांधण्यासाठी काटकसरीने करत असे. ईमारतीसाठी लागणारे बांधकाम साहित्य चांगले व कमी किमतीत कसे उपलब्ध होईल, या बाबत बारकाईने लक्ष ठेवत असत. फ्लोरिंगच्या मार्बलच्या लाह्या थेट राजस्थानवरून होल सेल भावात आणल्या आहेत. असो.
मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्रात पूरग्रस्त परिस्थिती ओढवली होती. आपल्या बुध्द प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने सर्व सभासदांना मिटींग व पत्रकाद्वारे पूरग्रस्तांसाठी आवाहन करण्यात आले. त्यास आपल्या सभासदांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला. कोरोना साथीच्या रोगाने जगात थैमान मांडला होता, त्यामुळे बांधकाम व संस्थेचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते आणि तत्कालीन अध्यक्ष देखील निवृत्त झाले त्याचा संस्थेच्या कार्यप्रणालीवर गंभीर परिणाम होऊ लागला, तरीही कोरोनाची पहिली लाट ओसरल्या नंतर वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून आहे त्याच कार्यकारिणीला निवडून देण्यात आले. त्या मध्ये अध्यक्षाना योग्य वाटतील असे बदल करण्याची परवानगी बहुसंख्येने देण्यात आली.
कोरोना मुळे कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असल्याने व बांधकामासाठी नवीन नियमावली लागू केल्या मुळे कारभार वर्ष दीडवर्ष ठप्प झाला, परंतु अशा ही प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी आपल्या संस्थेच्या सभासदांनी गावोगावी व विहारांमध्ये जाऊन धान्य वाटप केले. या कुशल कामामुळे आपल्या बुध्द प्रतिष्ठान संस्थेची ओळख महाराष्ट्रातील अनेक भागात झाली. संस्थेच्या वतीने आपल्या समाजातील लोकांसाठी आरोग्य शिबिरे, रक्त दान शिबिरे व विवाह इच्छुक मुला मुलींसाठी मंगल परिणय मेळावे घेऊन जनमानसात कार्यप्रणालीतून आपले स्थान रुजवण्यासाठी खूपच परिश्रम घेतले.'
विहाराचा दुसरा मजला व बुध्द मुर्तीची स्थापना करण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर डोम तयार केला आहे आणि आनंदाची बाब म्हणजे नवी मुंबई महानगरपालिके कडून संपूर्ण बांधकाम पूर्ण झाल्याने भोगवटा प्रमाण पत्र प्राप्त केले मध्यंतरीच्या काळात संस्थेच्या वतीने सोसायटी रजिस्टार कडून संस्थेच्या भूखंडाचे रजिस्ट्रेशन करुन बांधकामाच्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्या.
बांधवांनो, आपल्या समाजातील मुलांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन तसेच करिअर ओरियंटल कोर्सेस यांचे आयोजन करण्यासाठी पैसा खर्च करावा लागणार आहे. सध्या संस्थेच्या निधीचे स्त्रोत बंद असल्याने निधीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सभासदांनी पुढाकार घेऊन आर्थिकदृष्ट्या संस्थेला परिपूर्ण करण्यासाठी जबाबदारी घेणे आवश्यक आहे, तसेच संस्थेच्या हॉल मध्ये वातानुकूलित यंत्रणा सज्ज करणे व अंतर्गत सुशोभीकरण करण्यासाठी पैसा खर्च करावा लागणार आहे कारण संस्थेचा मेंटेनन्स, इलेक्ट्रिक बिल, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स ईत्यादी खर्च परस्पर भागवण्यासाठी हॉल सुसज्ज करणे आवश्यक आहे.
बांधवानो, आम्ही काही संस्थेच्या सभासदांनी पुढे येऊन हे संक्षिप्त संकलन आपणा पुढे सादर केले आहे या मध्ये संस्थेत ज्यांनी कमिटीत राहून कामे केली. त्या कमिटीच्या बाहेर राहून काम केले, तसेच संस्थेचे हितचिंतक असलेल्या सभासदांनी माहिती दिली आहे ती आपणा पुढे सादर करीत आहोत. तसेच संस्थेच्या दप्तरी असलेल्या कागद पत्राचा हे संकलन मांडत असताना खूप उपयोग झाला. यावरून आपल्या संस्थेने केलेली वाटचाल व भविष्यात आपण मोठ्या परिश्रमाने उभी केलेली संस्था कितपत यशस्वी होते, तग धरणार आहे, याचा अंदाज व्यक्त करताना आपल्याला त्याची वाटचाल निश्चित करण्यास मदत होईल. आज संस्थेच्या दप्तरी जवळजवळ ७०० सभासद आहेत परंतु प्रत्यक्षात ते तेवढे नसावे असे अनेक प्रसंगातून दिसून आले आहे. सभासदांची मोजणी होणे आवश्यक आहे. ढोबळ मानाने पाहिले तर ८०% सभासद ६० वर्षापेक्षा जास्त आहे आणि सक्रिय सहभाग ठेवणारे सभासद खूपच कमी आहेत. अशा वेळी आपल्या संस्थेच्या भविष्यातील वेध घेत काळजी करणे आवश्यक आहे. या बाबत आपल्या सभासदांनी विचार मांडून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. हे संकलन मांडत असताना या मध्ये कोणत्याही सभासदांचा किंवा कार्यकारिणीमध्ये काम केलेल्या सभसदाच्या नावाचा उल्लेख केला नाही. फक्त संस्था व घटनाक्रम या दोन गोष्टी लक्षात घेऊन पुढील वाटचालीसाठी चर्चा करताना अवघड होणार नाही याची दक्षता घेतली आहे.
संकलन, बुध्दप्रतिष्ठान समन्वय समिती यांच्या सौजन्याने
आयु. भास्कर सोपारे, आयु. वाय. बी. बागुल, आयु. आर. बी. बर्वे, आयु. मधुकर साळवे, आयु. सिध्दार्थ साळवे, आयु. कारभारी केदारे, आयु. दादा केदारे, आयु. देवेंद्र खाडे
प्रत्येक व्यक्तीचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक बौद्धिक दृष्ट्या विकास करणे तसेच तथागत गौतम बुद्धांचे तत्वज्ञान व शिकवण यांची ओळख करून देणे, विपश्यना केंद्र, श्रामनेर शिक्षण केंद्र चालविणे व भिक्षू निवासाची स्थापना करणे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक-सांस्कृतिक केंद्र व बुद्ध विहार निर्माण करणे.
मागासवर्गीय लोकांचा आर्थीक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक न्याय खाते भारत सरकार, राज्य सरकारे यांनी जाहीर केलेल्या लोकोपयोगी योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविणे व त्या योजनांचा सातत्याने पाठपुरावा करणे.
अंगणवाडी व बालवाडी वर्ग चालविणे. शासकीय/निमशासकीय अनुदानाच्या योजना राबवणे विविध स्पर्धांचे आयोजने करणे, सभा संमेलने, मेळावे, शिबिरे भरवणे. उपयुक्त आर्थिक लाभ मिळवून देणारे रोजगारा भिमुख व्यावसायिक प्रशिक्षण वर्ग, तांत्रीक शिक्षण, वगैरे करिता जिल्हा उद्योग केंद्र, विविध योजनांची माहिती घेवुन शिबिरे चर्चा सत्रे, सभा यांचे आयोजन करणे व योजनाचा लाभ गरजूंना मिळवून देण्याचा प्रयत्न करणे.
दुर्बल व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील शालेय विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक शुल्क, शालेय वह्या पुस्तके व लेखन सामग्री, गणवेश देवून मदत करणे.
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, वसतिगृहे, आश्रम, पुस्तकपेढी, पुस्तकालय, ग्रंथालय वाचनालय, प्रयोगशाळा, संशोधन केंद्र, शालोपयोगी वस्तु भंडार यांची उभारणी करणे, स्थापणे, संचालन करणे.व्यायाम शाळा बांधणे, व्यायाम प्रकारांच्या, खेळांच्या, कलेच्या स्पर्धांनी प्रोत्साहन देणे व कलागुणांना वाव देणे, क्रिडा संकुल उभारणे व संचालन करणे.
विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका ग्रंथालय तसेच संगणक यांची व्यवस्था करणे.
स्पर्धात्मक परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण केंद्र चालविणे. भारतात कोठेही बालवाडी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक , माध्यमिक, देशी भाषा / इंग्रजी भाषा माध्यमाच्या शाळा, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये, तंत्र विद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, संगणक, व्यवस्थापन महाविद्यालये, शिक्षण महाविद्यालये, कृषी महाविद्यालये, ज्ञानांच्या सर्व भाषांची महाविद्यालये,सैनिकी शाळा, आश्रम शाळा, वृध्दाश्रम, वस्तीगृहे, इ. स्थापना करणे, चालविणे, संचालित करणे, चालविण्यास मदत करणे.
उच्च शिक्षण व व्यावसायिक शिक्षण घेणार्या विध्यार्थ्याकरिता आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी साहय करणे.
व्यवसाय मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणे, बेरोजगारांना मार्गदर्शन करणे, रोजगारमेळावा आयोजित करणे. विद्यार्थ्यानकरिता अभ्यासिका, ग्रंथालय, तसेच संगणक यांची व्यवस्था करणे.
विध्यार्थ्याच्या शारीरिक व बौद्धिक विकासाठी विविध स्पर्धा आयोजित करणे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशिष्ट उपक्रम राबविणे.
महिलांच्या विकासाच्या दृष्टीने शासनप्रणीत योजनांचे मार्गदर्शन करणे, प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे, महिलाश्रम, वृद्धाश्रम, महिला सक्ष्मीकारणासाठी प्रयत्न करणे.
अनुसूचित जाती-जमाती, आदिवाशी व इतर भटक्या विमुक्त जाती तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासनाच्या असलेल्या विविध योजनांची त्यांना माहिती करून देणे व योग्य ते मार्गदर्शन करणे.
उच्च शिक्षण व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यानकरिता आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी साह्य करणे.
पर्यटन सहल आयोजित करणे.
विविध सामाजिक उपक्रम राबविणे
सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय या भारतीय संविधानातील मूल्यांची माहिती लोकांना देणे व त्याचा प्रसार करणे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती, तसेच महापरिनिर्वान दिन, भगवान बुध्द जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, सर्व राष्ट्र पुरुषांचे जन्मदिन/स्मृतिदिन, साजरे करणे. त्यासंबंधी साहित्य प्रकाशित करणे, सभा सम्मेलन आयोजित करणे. आंबेडकरी साहित्य, जनवादी साहित्य निर्मितीला प्रोस्ताहन देणे, अल्प दरात नागरिकांना उपलब्ध करून देणे, दैनिके, साप्ताहिके, मासिके, नियत कलिके प्रकाशित करणे व चालविणे, इलेक्ट्रोनिक मिडिया, प्रिंट मिडिया, निर्माण करणे, चालविणे, भारता बाहेरील अन्य देशांकडून सांकृतिक विकासासाठी निधी जमा करणे.
समाजातील अंधश्रद्धा, रूढीप्रियता नष्ट करण्यासाठी परिसंवाद, परिचर्चा, घडवून आणणे. त्यातूनच समाज प्रबोधन व परिवर्तन करणे. व्यसनमुक्ती शिबीर आयोजन करणे.
विवाहामंडळाची स्थापना करणे, सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन करणे व आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देणे.
लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मेची भावना वाढीस लावणे या दृष्टीने कार्यक्रम आयोजित करणे.
वृक्षरोपण, पर्यावरण आदि योजना संदर्भात लोकप्रशिक्षण करणे, सामाजिक बांधिलकी या नात्याने नैसर्गिक – अनैसर्गिक आपत्तीत जसे पूरग्रस्त, आपादग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे व नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्यांना योग्य ती मदत करणे.
मोफत वैद्यकीय आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, नेत्र चिकित्सा शिबीर, दांत चिकित्सा शिबिराचे आयोजन करणे व गरजूंना अंबुलंस सेवा उपलब्ध करून देणे. प्राण्यापासून माणसाला होणार्या आजाराबाबत (Zoonotic Diseases) जनप्रबोधन करणे.
मुंबई, नवी मुंबई व महाराष्ट्रातील संस्थेची सामाजिक, सांस्कृतिक केंद्रे तसेच शैक्षणिक वा आरोग्य केंद्रे इत्यादि लोकोपयोगी केंद्राची स्थापना करणे.
क्र. कार्यकारिणी सदस्यांची नावे पद संपर्क क्रमांक
1. डॉ. हर्षवर्धन अनंत नाना अध्यक्ष 9821689171
2. आयु. कांबळे राजू ज्ञानबा उपाध्यक्ष 9320334999
3. आयु. कांबळे नेताजी श्रीपती उपाध्यक्ष 9819247471
4. आयु. साळवे मधुकर शंकर सचिव 9004472687
5. आयुनि. आढाव रेवती शाम सहसचिव 9405190985
6. आयु. भालेराव पंडित वामन खजिनदार 9619544682
7. आयुनि. आढाव वैशाली संपत सहखजिनदार 9819386072
8. आयु. इंगळे विजय सोनाजी अंतर्गत हिशोब तपासणीस 9920411664
9. आयु. गांगुर्डे रमेश आनंदा सदस्य 9892012416
10. आयु. दैने हनुमंतराव तुळशीराम सदस्य 9773516947
11. आयु. चाकूरकर माधव ज्ञानबा सदस्य 9869431050
12. आयु. बागुल शेखर यादवराव सदस्य 9821040379
13. आयु. केदारे दादा रावबा सदस्य 9773229443
14. आयु. बोराळे सुरेश विठोबा सदस्य 8424018514
15. आयु. साळवे सिध्दार्थ सावळेराम सदस्य 9987072929
16. आयु. मर्चंडे विनायक भिकू सदस्य 8898829271
17. आयुनि. मेश्राम शीला विजयकुमार सदस्य 8424020128
18. आयुनि. कांबळे मीना भारत सदस्य 8169148370
19. आयु. गायकवाड तात्याराव लिंबाजी सदस्य 9821243425
20. आयुनि. कांबळे पुष्पा शिवाजी सदस्य 9220386246
अॅड. सचिन ठकसेन सोनावणे कायदे विषयक सल्लागार 7506640062